औरंगाबाद: गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही महापौरांसह महापालिका पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. आज गुरुवारी सातारा देवळाई येथून या विशेष कर आकारणी व वसुली मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील मालमत्ता धारकांकडे मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी कोटींच्या घरात आहे. पालिकेच्या तिजोरीत मात्र खडखडाट आहे. त्यामुळे विविध वार्डात विकास कामे केलेल्या ठेकेदारांसह अनेकांची देयके थकलेली आहेत. त्यामुळे महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी दोन वेळा कर वसुलीची विशेष मोहीम राबविली. यात पहिल्यांदा ११ तर दुसऱ्यांदा १३ अशी एकूण २४ कोटी रुपयांची वसुली झाली होती. यंदा पुन्हा विशेष कर वसुली मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आज गुरुवारी सातारा देवळाई परिसरातील आलोक नगर येथे या मोहिमेचा शुभारंभ महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाग ८ मधील सातारा-देवळाई वॉर्डात जुन्या ११ हजार ९२८ मालमत्तांची नोंद आहे. नव्याने २ हजार ६१४ मालमत्ता मिळून १४ हजार ५४२ मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले असून या मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली आहे.अद्यापही सर्वेक्षण झालेले नाही, अशा मालमत्ताधारकांनी कर लावण्याची मागणी केल्यास त्यांना जागेवर कर आकारणी करून डीमांड नोट दिली जाणार आहे.११ ते २२ जुलैदरम्यान ही मोहीम संपूर्ण शहरात राबविली जाणार आहे. या मोहिमेत कर आकारणी देखील करण्यात येणार आहे. प्रसंगी सहाय्यक कर निर्धारक जयंत खरवडकर, वार्ड अधिकारी मनोहर सुरेकर निरीक्षक कृष्ण दौंड आदींसह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.